दुसऱ्या लग्नासाठी ओमर अब्दुल्लांचा पहिल्या पत्नीला घटस्फोट
एबीपी माझा वेब टीम | 01 Mar 2018 10:34 PM (IST)
नात्यात कटुता आल्यामुळे ओमर अब्दुल्ला यांनी 2007 मध्ये पत्नीपासून फारकत घेतली होती.
नवी दिल्ली : जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पुन्हा लगीनगाठ बांधण्याची इच्छा आहे. त्यामुळे अब्दुल्लांनी पहिल्या पत्नीकडे घटस्फोट मागितला आहे. अब्दुल्लांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने ओमर यांची विभक्त पत्नी पायल यांना दिले आहेत. ओमर अब्दुल्ला आणि पायल यांच्या नात्यात 2007 मध्ये कटुता आली होती. 'आमचा तुटलेला संसार कधीच जुळवता येऊ शकत नाही' असं ओमर अब्दुल्लांनी घटस्फोटाच्या अर्जात म्हटलं होतं. न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल आणि दीपा शर्मा यांच्या खंडपीठाने पायल यांना नोटीस पाठवली आहे. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी उत्तर देण्यास कोर्टाने सांगितलं आहे. पायल यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 1 सप्टेंबर 1994 रोजी ओमर अब्दुल्ला आणि पायल यांचं लग्न झालं होतं. 2009 पासून दोघं विभक्त राहायला लागले. ओमर आणि पायल यांना दोन मुलं असून ती आईसोबत राहतात.