R N Kulkarni Death: भारतीय गुप्तचर संस्था आयबीचे निवृत्त अधिकारी आर. एन. कुलकर्णी (वय 83) यांचा अपघातात मृत्यू झाला नसून घातपात असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. कर्नाटक पोलिसांनी (Karnatka Police) या प्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये एका कारने जाणीवपूर्वक त्यांना धडक दिली असल्याचे दिसून आले आहे. 


म्हैसूरमध्ये 4 जुलै रोजी, सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या आर. एन. कुलकर्णी यांचा अपघाती मृत्यू झाला. सुरुवातीला 'हिट अॅण्ड रन'चे प्रकरण वाटत होते. मात्र, गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकाऱ्याचा असा मृत्यू झाल्याने पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली. पोलिसांना या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज मिळाले आहे. या सीसीटीव्ही फूटेजनुसार, कुलकर्णी हे वॉक करत असताना समोर उभी असलेली एक कार सुरू झाली. कारला रस्ता देण्यासाठी कुलकर्णी रस्त्याच्या एका बाजूला झाले. मात्र, कारनेदेखील त्यांच्या मार्गिकेत प्रवेश करत धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 






हत्येमागे भाजप नेत्यांना वेगळा संशय तर पोलिस म्हणतात...


माजी आयबी अधिकारी आर.एन. कुलकर्णाी 'लव जिहाद' वादावर तीन पुस्तके लिहिली होती. या पुस्तकातून भयाण परिस्थिती समोर आणली. त्यांची निर्घृण हत्या अत्यंत अस्वस्थ करणारी असल्याचे भाजप नेते सुनील देवधर यांनी म्हटले. या घातपातचा निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले. 







पोलिसांनी या हत्येमागे वेगळाच संशय व्यक्त केला. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून विविध अंगाने तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी त्यांच्या शेजाऱ्याचा वाद सुरू होता. कुलकर्णी यांचे शेजारी मडप्पा हे घर बांधत होते. त्यावेळी नियमाप्रमाणे मोकळी जागा सोडावी अशी विनंती कुलकर्णी यांनी केली होती. मात्र, शेजारी आणि त्यांचे या मुद्यावर वाद झाले. याआधीदेखील तीन वेगवेगळ्या कार धडक देण्याच्या उद्देश्याने पाठलाग करत होत्या, याची शक्यता त्यांनी मुलगी आणि जावयाकडे व्यक्त केली होती. आम्ही अमेरिकेत असल्याने त्यांना पोलीस तक्रार दाखल करण्याबाबत सांगितले होते. याबाबत पोलीस आणि पंतप्रधान कार्यालयालाही कारच्या क्रमांकासह पत्र लिहून त्यांनी कळवले होते, अशी माहिती कुलकर्णी यांचे जावई संजय अंगडी यांनी दिली.


पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 302 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कुलकर्णी यांचे जावई संजय अंगडी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मडाप्पा  आणि त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.