नवी दिल्ली : इंडियन युनियन मुस्लीम लीगचे अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांचं निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणादरम्यान ई अहमद यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

ई अहमद यांना दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. परंतु रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

परंतु ई अहमद यांच्या निधनामुळे बजेट सादर होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री ई अहमद यांचं पार्थिव आज सकाळी 8 ते 12 दरम्यान दिल्लीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर पार्थिव केरळमधील त्यांच्या मूळगावी नेण्यात येईल. ई अहमद हे केरळच्या मलप्पुरम मतदारसंघातील खासदार होते.



ई अहमद यांचा राजकीय प्रवास

- पक्ष - इंडियन युनियन मुस्लीम लीग

- माजी पंतप्रधान महमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ई अहमद परराष्ट्र राज्यमंत्री होते.

- ई अहमद यांची सहा वेळा खासदार आणि 5 वेळा आमदार म्हणून निवड झाली होती.

- अहमद पाच वर्ष केरळमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते.

- ई अहमद यांचा जन्म 29 एप्रिल 1938 मध्ये झाल होता. त्यांचं वय 79 वर्ष होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

अहमद यांच्या निधनाने अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह



केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु ई अहमद यांच्या निधनामुळे बजेट सादर होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अधिवेशानादरम्यान लोकसभा किंवा राज्यसभा सभासदाचं निधन झाल्यास श्रद्धांजली देऊन संबंधित सभागृहाचं कामकाज एका दिवसासाठी स्थगित करण्याची परंपरा आहे. ई अहमद यांचं निधन झाल्याने अर्थसंकल्प सादर होणार का याबाबतचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेणार आहेत.