नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते. गेल्या महिन्यात 15 जुलै रोजी त्यांना गुरुग्राम मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चेतन चौहान हे उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातले दुसरे मंत्री आहेत ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याआधी 3 ऑगस्टला कॅबिनेट मंत्री कमल राणी यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता.


चेतन चौहान यांना 11 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना किडनी आणि उच्च रक्तदाबाची समस्या सुरु झाली होती. प्रकृती बिघडल्याने त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान दोन वेळा चेतन चौहान यांची कोरोना टेस्ट निगेट्विव्ह आली होती. त्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.


चेतन चौहान यांची राजकीय कारकीर्द उत्तर प्रदेशात बहरली. पण त्यांचे क्रिकेट महाराष्ट्राने घडवले. महाराष्ट्राकडून ते रणजी खेळले, छान मराठी बोलत आणि प्रत्येक भेटीमध्ये पुण्याच्या आठवणी काढत. सुनील गावस्कर आणि चेतन चौहान भारताचे भरवशाचे आघाडीचे खेळाडू होते. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासोबत त्यांची ओपनर जोडी लोकप्रिय होती. भारतासाठी त्यांनी 40 कसोटी सामने खेळले होते. त्यात त्यांनी 2084 धावा केल्या होत्या.


चेतन चौहान यांनी गावस्करांना सतत मोलाची साथ दिली. पण एका बाबतीत ते अभागी ठरले. नव्वदीच्या घरात गेले की नर्व्हस होऊन आऊट होत. परिणामी कसोटीमध्ये नावावर भरपूर धावा असल्या तरी त्यात शतक एकही नाही. क्रिकेट कारकिर्दित एकही शतक न साजरं करता दोन हजारहून अधिक धावा करणारे ते एकमेव खेळाडू आहेत.


चेतन चौहान यांची राजकीय कारकिर्द


चेतन चौहान यांनी 1991 मध्ये अमरोहा येथून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तेथून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर पुन्हा एकदा 1996 भाजपने त्यांना याच ठिकाणाहून निवडणुकीच्या मैदानात उतरवले. परंतु त्यावेळी त्यांचा पराभव झाला. 1998 मध्ये चेतन चौहान पुन्हा खासदार म्हणून निवडून गेले. त्याच वेळी त्यांनी 1999 आणि 2004 च्या लोकसभा निवडणुकीत नशीबही आजमावले परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या ते अमरोहा जिल्ह्यातील नौगावाचे आमदार होते.