COVID Heart Attack : धकाधकीची जीवनशैलीमुळे सध्या अनेक समस्यांचा सामना संपूर्ण जग करत आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोना (Coronavirus) महामारीने तर सर्वांचंच आयुष्य बदलून टाकलं आहे. अशातच सध्या हृदयविकाराच्या (Heart Attack Risk) घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. व्यायामशाळेत व्यायाम करतानाही तरुणांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना आणि वाढत्या हृदयविकाराच्या घटनांची एकमेकांशी सांगड घातली जात आहे. कोरोनानंतर हृदयविकाराचा झटका (Heart Attack), मधुमेह (Diabetes) आणि स्ट्रोकचा धोका वाढतो, असं वक्तव्य माजी डब्ल्यूएचओ (WHO) च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी मंगळवारी (28 फेब्रुवारी) बोलताना सांगितलं.
सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं की, "कोविड-19 चा मानवाच्या श्वसनसंस्थेवर घातक परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका, मधुमेहाचा धोका वाढतो. कोरोनानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लस घेतल्यानंतरच्या तुलनेत 4 ते 5 टक्के जास्त असतो. हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमुख कारण म्हणजे, कोरोना संसर्ग. हा व्हायरस अशाप्रकारे बदलण्याची शक्यता नाही की तो लसीद्वारे तयार केलेली प्रतिकारशक्ती नष्ट करु शकतो, परंतु सतत देखरेख करणे महत्वाचे आहे.
डॉक्टरांचं म्हणणं नेमकं काय?
यापूर्वी नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीचे व्हिजिटिंग कन्सल्टंट डॉ. बिक्रम केशरी मोहंती यांनी अलीकडेच ABP न्यूजशी बोलताना सांगितलं की, "कोविड-19 व्हायरस शरीरातील कोणत्याही प्रणालीवर परिणाम करु शकतो. त्याचा प्रामुख्याने फुफ्फुसांवर आणि नंतर हृदयावर परिणाम होतो." ते पुढे म्हणाले की, "व्हायरल इन्फेक्शनमुळे संपूर्ण हृदयावर (हृदयाच्या स्नायू) जळजळ होऊन त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे या अवयवाला नुकसान पोहोचू शकतं, ज्याला मायोकार्डिटिस म्हणतात."
देशातील सध्याची कोरोनाची स्थिती
देशातील कोरोनाच्या स्थितीबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 169 नवे रुग्ण आढळले आहेत. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सध्या 2,257 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (28 फेब्रुवारी) रोजी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या 5,30,771 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत लसीचे 220.63 कोटी डोस देण्यात आलेत
आकडेवारीनुसार, भारतात एकूण संक्रमित लोकांची संख्या 4,46,86,371 वर पोहोचली आहे. मंत्रालयाने सांगितलं की, "संसर्गातून बरं होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे." आकडेवारीनुसार, देशात 4,41,53,343 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत, तर मृत्यूचं प्रमाण 1.19 टक्के नोंदवलं गेलं आहे. आतापर्यंत देशात कोरोनाविरोधी लसींचे 220.63 कोटी डोस देण्यात आले आहेत.