पाटणा : चारा घोटाळा प्रकरणाशी संबंधित चाईबासा ट्रेजरी प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाला आहे. झारखंड हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी लालू प्रसाद यादव हे जेलमध्येच राहणार आहेत, कारण त्यांच्यावर दुमका कोषागार प्रकरणात देखील आरोप आहेत.


माहितीनुसार, लालू प्रसाद यादव हे  चारा घोटाळा प्रकरणात तीन वेगवेगळ्या केसमध्ये आरोपी आहेत. त्यांना या प्रकरणी 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.   23 डिसेंबर 2017 पासून ते झारखंच्या राजेन्द्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) मध्ये भरती आहेत. काही महिन्यांपूर्वी  कोरोना व्हाययस पासून वाचण्यासाठी त्यांना  रिम्स संचालकांच्या बंगल्यात शिफ्ट केलं असल्याची माहिती आहे.





सप्टेंबर 2013 मध्ये चारा घोटाळा प्रकरणी दोषी आढळल्यानंतर लालू प्रसाद यादवांना अटक झाली होती. त्यानंतर  2014 मध्ये ते जामिनावर बाहेर आले. मात्र नंतर पुन्हा  23 डिसेंबर 2017 मध्ये लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर त्यांना बिरसा मुंडा जेल मध्ये पाठवण्यात आलं. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. सध्या न्यायालयीन कोठडी अंतर्गत त्यांच्यावर रिम्समध्ये उपचार सुरु आहेत.