नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी झोपेतही चार कोटी कमावतात, अशी माहिती ‘फोर्ब्स’ने जारी केलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समोर आली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘फोर्ब्स’ने कॉर्पोरेट, क्रिकेट, बॉलीवूडमधील धनाढ्यांची यादी आणि कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे.
‘फोर्ब्स’च्या यादीनुसार मुकेश अंबानी सलग नवव्या वर्षी देशातील श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 22.7 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1.52 लाख कोटी रुपये एवढी आहे. ही कमाई 86 देशांच्या विकासदरापेक्षाही अधिक आहे.
मुकेश अंबानींचा महिन्याचा पगार 39 कोटी रुपये इतका आहे. मुकेश अंबानी सात तास झोपतात. त्यानुसार त्यांच्या एकूण मालमत्तेचा हिशेब पाहिला तर झोपेतही ते 4 कोटी 37 लाख रुपये कमावतात.
क्रिकेटमधील श्रीमंत खेळाडू
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने वर्षभरात 207 कोटी कमावले. यामध्ये त्याने 27 कोटी क्रिकेटमधून तर 180 कोटी जाहिरातीतून कमावले आहेत. सचिन तेंडुलकरने निवृत्तीनंतर 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे. टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने वर्षभरात 192 कोटी रुपये कमावले. जाहिरात विश्वात आपला दबदबा निर्माण करण्यात विराटला यश मिळाल्याचं यातून दिसत आहे.
बॉलिवूडमधील श्रीमंत कलाकार
कॉमेडी किंग कपिल शर्माने प्रेक्षकांना हसवून हसवून 60 कोटी कमावले. जगभरातल्या सर्वाधिक कमाई करणार्या टॉप दहा अभिनेत्रींमध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दहाव्या क्रमांकावर आहे. वर्षभरात दीपिकाने 67 कोटी रुपये कमावले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी मागील वर्षी जवळपास 218 करोड रुपये कमावले होते.