PM Modi Covid Meeting: स्थानिक पातळीवर कोरोना नियंत्रणावर लक्ष केंद्रित करा. तसेच अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. कोरोना काळात अर्थव्यवस्था कोलमडणार नाही याकडे लक्ष केंद्रीत करा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना केली आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या राज्यातील कोरोना स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच  लॉकडाऊन लागणार लागणार नाही, याची काळजीही घ्या असा सल्ला दिलाय. 


देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अतिशय वेगाने लसीकरण सुरु आहे. लसीकरण वेगाने होत असतानाही कोरोनाचा संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाही, त्यामुळे काही जणांकडून लसीकरणाबाबत भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मास्कबाबतही अशाच अफवा उठतात. अशा अफवांना उत्तर देण्याची खूप गरज आहे. अशाप्रकारचे प्रयत्न हाणून पाडा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केलं आहे.  तसेच राज्यातील कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचनाही पंतप्रधानांनी राज्यांना केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "केंद्राने राज्यांना 23 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा वापर करुन अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटं लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात."


कोरोना महामारीसोबत लढण्याचा आपल्याला आता दोन वर्षाचा अनुभव आहे. देशव्यापी तयारीही आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेकांचे नुकसान झालेय. नोकऱ्याही गेल्या आहेत. अर्थचक्र रखडलेही होते. आता पुढील काळात अर्थचक्र रखडू नये, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कोरोना काळात सामान्य लोकांचे काम-धंदे, आर्थिक बाबींचं कमीत कमी नुकसान व्हावं. आपल्या अर्थव्यवस्थेची गती कायम राहिली पाहिजे. कोणतीही रणनिती बनवताना आपण या बाबी कायम लक्षात ठेवायला हव्यात, असे मोदी म्हणाले.  


कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक  कन्टेन्मेंटवर अधिक भर देणं गरजेचं आहे. जिथून जास्त प्रकरणं येत आहेत. त्याठिकाणी जास्तीत जास्त वेगानं टेस्टिंग करण्यात याव्यात. याशिवाय होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार व्हावेत. होम आयसोलेशनदरम्यान ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट जितकं चांगलं होईल तितकचं रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही, अशी सूचना यावेळी मोदींनी दिली आहे. सध्या वेगाने पसरत असलेल्या  ओमायक्रॉन व्हेरियंटशी दोन हात करताना भविष्यात येणाऱ्या व्हेरियंटसाठी देखील आपण तयारी सुरु करायला हवी, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना सांगितलेय.  






दरम्यान, ओमायक्रॉनचा संसर्ग आणि कोरोनाचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधला. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीत भाग घेतला.