DGCA : देशात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. चौथ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने (DGCA) विमानतळावर आणि प्रवासादरम्यान काही नियम लागू केले आहेत.  DGCAने विमानतळावर आणि विमानाने प्रवास करताना मास्क सक्तीचा केलाय. गेल्या आठवड्यात हायकोर्टाने फटकारल्यानंतर DGCA ने नवीन नियमावली जारी केली आहे. 


मास्क अनिवार्य - 
DGCA ने बुधवारी सांगितले की, विमानात आणि विमानतळावर असणाऱ्या सर्वांना मास्क वापरणे सक्तीचे आहे. जो प्रवासी/व्यक्ती मास्क वापरत नाही, त्याला माघारी पाठवम्यात येईल. जर एखादा प्रवासी मास्क वापरण्यास नकार देत असेल तर त्याला विमानात जाण्यास परवानगी देण्यात येणार नाही. कोरोना नियमांचं पालन सर्वांना अनिवार्य आहे. डीजीसीएने असेही सांगितले की, कोरोना नियमांचं पालन न केल्यास प्रवाशांना  सीआयएसएफ जवानांकडे सोपवण्यात येईल. तसेच त्यांना आर्थिक दंडही ठोठावण्यात येईल. दरम्यान,  कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर विमानतळावर मास्क वापरण्यात सूट देण्यात आली होती. पण आता कोरोना रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विमानतळावर कोरोना नियम कठोर करण्यात आले आहेत. 
 
नियमांचं पालन न केल्यास नो फ्लाई झोनच्या यादीत -  
गेल्या आठवड्यात हाय कोर्टानं DGCA ला चांगलेच फटकारले होते. विमान तळावर आणि विमानात कोरोना मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, असं हायकोर्टानं DGCA ला सांगितले होते.  कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे कोरोना नियमांचं पालन करणे अनिवार्य आहे, असे कोर्टाने सांगितले होते. 'जो व्यक्ती कोरोना नियमांचं पालन करत नाही, त्यावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी. त्याला आर्थिक दंडही ठोठावावा. तसेच त्याचं नाव नो फ्लाई झोनच्या यादीत दाखल करावे, असे कोर्टानं DGCA ला सांगितले होते.'


एअरलाईन्सला सूचना काय?


प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्यावर मास्क अनिवार्य.. 


संकेतस्थळं, ट्रव्हल एजंट अथवा फोनवरुन वयोवृद्ध प्रवाशांना कोरोना नियमांबाबत माहिती द्या.


विमानात कोरोना नियमांबाबात नियमीत घोषणा


अतिरिक्त मास्क विमानात ठेवा, गरज असल्यास प्रवाशांना द्या


जर एखादा प्रवाशी कोरोना नियमांचं पालन करत नसेल तर तर त्याला विमानात प्रवेश देऊ नका. 


कोरोना नियमांचं पालन करत नसतील तर प्रवाशांना नो फ्लाय झोनमध्ये टाका


विमानतळाला काय सूचना?
मास्कशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नका... फक्त सुरक्षारक्षकच प्रवाशांना विमानतळाच्या आत सोडतील.
कोरोना नियमांबाबत नियमीत घोषणा केली जाईल. 
एखादा प्रवाशी मास्क वापरत नसेल तर त्याला आर्थिक दंड ठोठावा, अथवा त्या प्रवाशाला सुरक्षा यंत्रणांकडे सुपूर्द करा
विमानतळावर सॅनिटायझरची सोय करा... 


दरम्यान, भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण देशातील कोरोनाच्या संसर्गात वाढ कायम आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात पाच हजार 233 नवीन रुग्णांना कोरोनाची वाढ झाली आहे. ही मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ आहे.  देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 28 हजार 857 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.