नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन केलं आहे. या घटनापीठापुढे 10 जानेवारीपासून अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वात हे घटनापीठ काम करणार असून या घटनापीठात न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामन, न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड या मराठमोळ्या न्यायमूर्तींचा  समावेश आहे.


गेल्या 29 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी केली जाईल, असं जाहीर केलं होतं. याप्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी करणारा अर्ज हिंदू महासभेने केला होता. त्यामुळे आता या घटनापीठमार्फत 10 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशातील सर्वात मोठ्या प्रकरणाचा निकाल मराठी न्यायमूर्तींचं बहुमत असलेलं घटनापीठ देणार आहे.


कोण आहेत हे मराठमोळे न्यायमूर्ती?


न्यायमूर्ती शरद बोबडे


- नागपूरमध्ये 24 एप्रिल 1956 रोजी जन्म
- नागपूर विद्यापीठातून बीए एलएलबीची पदवी
- 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिलीपासून सुरुवात
-  मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती
- 2012 मध्ये मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती
- एप्रिल 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती
- 23 एप्रिल 2021 पर्यंत सर्वोच्च न्यायालयातील कालावधी


न्यायमूर्ती उदय लळित


- 9 नोव्हेंबर 1957 चा जन्म
- जून 1983 पासून वकिलीला सुरुवात
- सुरुवातीची काही वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली
- 1986 पासून दिल्लीत तर 2004 ला सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून कामकाज पाहिलं
- 2 जी प्रकरणात सीबीआयकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
- 13 आॉगस्ट 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती
- 8 नोव्हेंबर 2022 ला निवृत्त होणार


न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड


- दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रातून बीएची पदवी, त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षण
- अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून एलएलएमचं शिक्षण
- 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती
- त्याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
- मुंबई उच्च न्यायालयात 2013 पर्यंत न्यायाधीश
- सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली
- देशाचे माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांचे पुत्र
- आधार, समलैंगिकता यासह गेल्या काळात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये चंद्रचूड यांच्या निकालांची चर्चा