नवी दिल्ली : सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याच्या शूर जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. 21 महिन्यानंतर या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ समोर आला आहे. जवानांनी धाडस दाखवत कशाप्रकारे दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली हे आठ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे?
भारतीय सैन्यातील पॅरा कमांडोंच्या आठ पथकांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकदरम्यान भारतीय सैन्याने रॉकेट लॉन्चर, मिसाईल आणि छोट्या शस्त्रांसह हल्ला केला होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर सर्व कमांडो सुरक्षित परतले होते. ड्रोनच्या मदतीने सर्जिकल स्ट्राईकचा हा व्हिडीओ बनवल्याचं समजतं.
सर्जिकल स्ट्राईकची संपूर्ण मोहीम सहा तास सुरु होती. मध्यरात्री पहिला हल्ला करण्यात आला, तर शेवटचं ठिकाण सकाळी सहा ते सव्वासहाच्या दरम्यान उद्ध्वस्त करण्यात आलं. भारतीय कमांडोंनी कशाप्रकारे पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांच्या विविध ठिकाणांवर हल्ला केला हे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक
दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर केलेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. 18 सप्टेंबर 2016 रोजी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 19 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या अकरा दिवसांनंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन बदला घेतला होता.
29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीन किमी आत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावेळी भारताने पाकिस्तानच्या भूमीवर असलेले अतिरेक्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तानच्या सीमेत असलेले हे लॉन्चिंग पॅड भारतीय जवानांनी नेस्तनाबूत केले होते.
राजकीय फायद्यासाठी व्हिडीओ जारी : काँग्रेस
दुसरीकडे, सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ जारी करण्याच्या टायमिंगवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. राजकीय फायद्यासाठी जवानांच्या बलिदानाचा अपमान केला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "मोदी सरकार आणि भाजप देशाच्या सैनिकांचा तसंच सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे."
"दहशतवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा आणि देशाविरोधातील दहशतवादी मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेसने सैन्याचे आभार मानले होते. पण दुर्दैवाने भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्जिकल स्ट्राईकचा लाजिरवाण्या पद्धतीने वापर केला," असं सुरजेवाला म्हणाले.