Floating Bridge Collapse : उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी पाण्यावर तरंगणारा पूल वाहून गेला आहे. कर्नाटकातील उडपी येथे हा राज्यातील पाण्यावर तरंगणारा पहिला पूल उभारण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी म्हणजे 6 मे रोजी या पुलाचे उद्घाटन झाले होते. हा पूल तयार करण्यासाठी कर्नाटकच्या राज्य सरकारने तब्बल 80 लाख रूपये खर्च केले होते. कर्नाटकात रविवारी आलेल्या चक्रीवादळानंतर हा पूल अर्धवट कोसळला होता, आज तो पूर्ण पाहून गेला.  


पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्नाटक सरकारने 100 मीटर लांब आणि तीन मीटर रुंदी असलेल्या या तरंगत्या पुलाची निर्मिती केली होती. या पुलावर एकावेळी शंभर लोक चालू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, या तरंगत्या पुलावर पर्यटकांना केवळ 15 मिनिटे थांबण्याची परवानगी कर्नाटक सरकारकडून देण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी आमदार रघुपती भट यांनी या पुलाचे उद्घाटन केले होते. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने रविवारी बंगळुरूच्या अनेक भागांना झोडपले आहे. या पावसात अनेक झाडे उन्मळून पडली आणि रस्ते जलमय झाले आहेत. याच वादळात हा पूल वाहून गेला आहे. 


पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर केलेल्या भाषणात आमदार रघुपती भट यांनी म्हटले होते की, मालपी येथील समुद्र किनाऱ्याला या पूर्वीच मान्यता मिळाली आहे. येथे जलक्रीडेचा आनंद घेण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक समुद्रकिनारी येतात. हा समुद्रकिनारा परदेशी लोकांना आकर्षित करत आहे आणि आता हा पूल बांधल्यानंतर ते आणखी आकर्षक ठिकाण बनले आहे. परंतु, उद्घाटनाच्या अवघ्या तीन दिवसांनंतर पूल वाहून गेल्यामुळे पुलाच्या बांधणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  शिवाय या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांतून मागणी करण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या


Taj Mahal : ताज महालातील 22 खोल्यांचं काय होणार? आज सुनावणी टळली, पुढील सुनावणी गुरुवारी


OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का; दिले हे महत्त्वाचे आदेश