नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे काँग्रेसने 10 सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात हल्लाबोल चढवला.
10 सप्टेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत 'भारत बंद' ठेवण्याचं आवाहन काँग्रेसने केलं आहे.
इंधनाच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. जनतेमध्ये आक्रोश आहे. भारत बंद ठेवण्यासाठी आम्ही विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे, असं काँग्रेस नेते अशोक गेहलोत म्हणाले. 11 लाख कोटी रुपयांच्या 'फ्यूएल लूट'विरोधात काँग्रेस जन आंदोलन छेडणार आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पेट्रोल, डिझेलसह एलपीजीच्या किमती दुपटीने वाढल्याचा उल्लेख केला. दूध दरापासून प्लॅटफॉर्म तिकिटापर्यंत सर्वच गोष्टींचे भाव वधारल्याचंही सुरजेवाला म्हणाले. पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत असल्याचंही ते म्हणाले.
पेट्रोलचे दर प्रतिलीटर 79.51 रुपयांवर, तर डिझेल 71.55 रुपयांवर पोहचलं आहे.