रायपूर : महात्मा गांधी यांच्याबद्दल कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्तीगडची राजधानी असलेल्या रायपूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंसदेत त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे. रायपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांनी कालीचरण यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.


सध्या देशातील वेगवेगळ्या राज्यात हिंदू धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येत आहे.  या धर्मसंसदेतून अनेक वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहेत. अशातच आता कालीचरण महाराज यांनीही वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. कालीचरण महाराज यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज


मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी १९४७ मध्ये देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे.


यावेळी बोलताना कालीचरण महाराज यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकावरही जोरदार निशाणा लगावला. धर्माची रक्षा करण्यासाठी कट्टर हिंदू नेत्यालाच सरकारचा प्रमुख करायला हवे. छत्तीसगडमधील सरकार हे पोलीस प्रशासनाचे गुलाम आहेत. त्यामुळे याठिकाणी कट्टर हिंदू नेता मुख्यमंत्री होणे गरजेचे असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले. हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारमध्ये एक कट्टर हिंदू राजा निवडणे गरजेचे आहे.
 


कोण आहेत कालीचरण महाराज?
कालीचरण महाराज हे विदर्भातील अकोल्याचे आहेत. त्यांचे मुळ नाव हे अभिजित धनंजय सराग आहे. अकोल्यात एका मंदिरात म्हटलेल्या शिवतांडव स्त्रोत्राचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कालीचरण महाराज हे चर्चेत आले होते. कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं त्यांनी वारंवार सांगितले आहे.
 


काही दिवसांपूर्वी  सांगलीतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोरोना हा फर्जीवाडा आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा फर्जीवाडा संस्था आहे. त्यांचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी आहेत. असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे. करोना हा भयानक महामारी नाही. ज्या करोनामुळे लोकांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टराणी मारले आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला होता. 


महत्त्वाच्या बातम्या: