मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी अडचणीत येण्याची शक्यता आहे. साक्षी धोनीविरोधात कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्षीसह अन्य तिघांविरोधात भादंवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुग्राममधील डेनिस अरोराच्या ऱ्हिती एमएसडी अॅल्मोड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक साक्षी धोनी, अरुण पांडे, शुभवती पांडे, प्रतिमा पांडे यांचा यात समावेश आहे.
ऱ्हिती एमएसडी अॅल्मोड कंपनीचे स्पोर्ट्सफीट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये शेअर्स आहेत. स्पोर्ट्सफीट वर्ल्ड हे गुरुग्राममधील नामांकित जिम आणि फिटनेस सेंटर आहे. याच कंपनीत डेनिस अरोराचे 39 टक्के शेअर्स होते.
31 मार्चपर्यंत 11 कोटी रुपये देण्याच्या अटीवर डेनिसने ऱ्हिती एमएसडी अॅल्मोड कंपनीला 39 टक्के शेअर्स विकण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आतापर्यंत आपल्याला केवळ 2.25 कोटी रुपयेच मिळाल्याचा दावा डेनिसने केला आहे.
शेअरच्या किमतीनुसार आपण पैसे दिल्याचं कंपनीचे संचालक अरुण पांडेंनी म्हटलं आहे. साक्षीने वर्षभरापूर्वीच ही कंपनी सोडल्याची माहितीही पांडेंनी दिली आहे. त्यामुळे साक्षीविरोधात केस दाखल करता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.