भोपाळ : कर्नल सोफिया कुरेशींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इंदुरच्या मानपूर ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून बोलताना भाजपच्या विजय शाहांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशमधील एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशींचा उल्लेख अतिरेक्यांची बहीण असा केला होता. त्यावरून गदारोळ सुरू झाला. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. विजय शाहांच्या हकालपट्टीचे आदेश स्वतः पंतप्रधानांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत, अशी मागणी रमेश यांनी केली होती.
कर्नल सोफिया यांच्याविरोधात विजय शाहांनी केलेल्या वक्तव्याची जबलपूर उच्च न्यायालयाने दखल घेतली. विजय शाहांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी मध्य प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना दिले. तसेच विजय शाहांनादेखील न्यायालयाने चांगलंच खडसावलं.
FIR Against BJP Vijay Shah : मुख्यमंत्र्यांची भेट
मध्य प्रदेश भाजप अध्यक्ष व्ही.डी. शर्मा आणि संघटन सरचिटणीस हितानंद शर्मा यांनी विजय शहा यांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री मोहन यादव यांची भेट घेतली. यापूर्वी व्हीडी शर्मा म्हणाले होते की भाजप हायकमांड अशा घटनांबद्दल खूप गंभीर आहे. कर्नल सोफिया कुरेशी या देशाची कन्या आहेत आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे असं ते म्हणाले होते.
विजय शाहांची माफी
कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर सर्वबाजूंनी टीका झाल्यानंतर विजय शाह यांनी माफी मागितली. आपण केलेल्या वक्तव्याची आपल्याला लाज वाटते असं ते म्हणाले होते. विजय शाहांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली.
Congress Protest Againt Vijay Shah : काँग्रेसने पुतळा जाळला
दरम्यान, कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानावर संताप व्यक्त करत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी (14 मे) इंदूरमध्ये मंत्री विजय शाह यांचा पुतळा जाळला. शहरातील रिगल चौकात काँग्रेस महिला मोर्चाच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनादरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे आदिवासी व्यवहार मंत्री शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी त्यांचा राजीनामाही मागितला.
ही बातमी वाचा: