नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोत एका महिला पत्रकाराशी छेडछाड झाल्याचं समोर आलं असून, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 13 नोव्हेंबरची ही घटना असून, जवळपास 10 मिनिटं हा आरोपी दोन तरुणींची छेड काढत होता.

आयटीओ स्टेशनवर ही घटना घडली. यानंतर पीडित महिलेने यमुना बँक पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली.

मेट्रो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटीओ मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकच्या पायऱ्या उतरताना एका व्यक्तीने महिला पत्रकाराला धक्का दिला. सुरुवातीला त्या महिला पत्रकाराला त्याने चुकून धक्का लागला असल्याचं वाटलं.

पण त्या व्यक्तीने पुन्हा तिला धक्का दिला, पण त्यातून सावरण्यात तिला काहीकाळ गेला. यावेळी घटनास्थळी एकही सुरक्षा रक्षक नव्हता.

महिला पत्रकाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तसेच जवळपास पाच हजार जणांची चौकशी केली. यानंतर एका 25 वर्षीय तरुणाला अटक केली.

चौकशीनंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.