Farmers Protest : वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये काही मुद्यांवर सहमती झाली आहे. संयुक्त किसान मोर्चाने याबाबत बुधवारी रात्री संकेत दिले. दीर्घकाळ सुरू असलेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारच्या मसुद्यावर एकमत झाले आहे. आता, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. नवीन मसुद्यावर सरकारकडून औपचारिकपणे सहमती मिळाल्याचे समजताच आंदोलन स्थगित करण्याची घोषणा होऊ शकते.
शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार
शेतकरी नेते आणि एसकेएम कोअर कमिटीचे सदस्य गुरनाम सिंह यांनी सांगितले की, प्रलंबित मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा मसुदा मान्य नव्हता, त्यानंतर केंद्राने बुधवारी प्रस्तावाचा नवा मसुदा पाठवला आहे. एसकेएमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठवलेल्या नवीन प्रस्तावात हे स्पष्ट करण्यात आले आहे की किमान आधारभूत किंमत (एमएसपी) समितीमध्ये एसकेएमच्या सदस्यांचा समावेश असेल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा सरकारने शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यास सहमती दर्शवली आहे. दिल्लीतील गुन्हेही मागे घेतले जाणार आहे. आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याबाबत तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाची (एसकेएम) गुरुवारी दुपारी १२ वाजता दुसरी बैठक होणार आहे. सिंघू सीमेवर होणाऱ्या बैठकीत आंदोलन स्थगित करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
वीज विधेयकाचे काय?
वीज कायदा सुधारणा विधेयकातील शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या नियमांबाबत संयुक्त किसान मोर्चासोबत चर्चा करण्यात येईल. त्याआधी हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार नसल्याची ग्वाही केंद्राकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Farmers Protest : घटनात्मकरित्या कायदे रद्द, पण शेतकरी आंदोलन सुरुच; नेमकी दिशा काय?
- नागालँड गोळीबाराशी AFSPA या कायद्याचा संबंध काय? जाणून घ्या या विशेष कायद्याबाबत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha