सुरत : जिल्हा बँकांना जुन्या नोटा बदलण्यास लावलेल्या निर्बंधांमुळे सुरतमध्ये शेतकरी संतप्त झाले आहेत. सुरतच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.


धान्याच्या बाजारात शेतकऱ्यांचे दररोजचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान्य आणि ऊसाच्या ट्रक आणि ट्रॉलीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर शेतकऱ्यांनी सुरतच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर दूध ओतून निषेध व्यक्त केला.

पाचशे हजारच्या नोटा बंद केल्यानंतर अशा नोटा स्वीकारण्यास सहकारी बँकांना बंदी घालण्यात आलीय. मात्र स्थानिक पातळीवर काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने सहकारी बँकांवर घातले आहेत. त्यामुळे सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प आहेत.

जिल्हा बँकांना नोटा बदलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना केली होती. मात्र केंद्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली. जुन्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास सहकारी बँकांना कदापि परवानगी देणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ठणकावून सांगितलं.