पाटणा : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच ईव्हीएमचा मुद्दा गाजला आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ईव्हीएमच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.


''पराभवाच्या भीतीने ज्यांना ईव्हीएमवर टीका करायची आहे, त्यांनी करावी. मात्र ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली आहे. मतदारांना मतदानापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही'', असं ट्वीट नितीश कुमार यांनी केलं.

गुजरात विधानसभेचा निकाल लागायला काही तास बाकी आहेत. मात्र एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर आतापासूनच ईव्हीएममध्ये घोळ करुन भाजप जिंकणार असल्याची टीका केली जात आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेलने ईव्हीएम हॅकिंगचा आरोप केला आहे.

5 हजार EVM हॅकिंगसाठी गुजरातमध्ये 140 इंजिनिअर तयार : हार्दिक पटेल

"अहमदाबादमधील एका कंपनीतील 140 सॉफ्टवेअर इंजिनिअर 5 हजार EVM मशिनना सोर्स कोर्डच्या माध्यमातून हॅक करण्याच्या तयारीत आहेत", असं ट्वीट हार्दिक पटेलने केलं.

"माझ्या विधानांवर तुम्हाला हसू येऊ शकतं, मात्र विचार कुणीच करणार नाही. इश्वराने बनवलेल्या या मानवी शरीराशी जर छेडछाड होऊ शकते, तर मानवाद्वारे बनवलेल्या EVM मशिनशी छेडछाड का होऊ शकत नाही? ATM हॅक होऊ शकतात, मग EVM का नाही?", असा प्रश्न हार्दिक पटेलने उपस्थित केला.