लखनौ : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज (गुरुवार, 11 एप्रिल) उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस आणि सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, माझ्या आईची लोकांवर श्रद्धा आहे. ती केवळ लोकसेवा करते, त्यामुळे सर्व नेत्यांनी माझ्या आईचा आदर्श घ्यायला हवा.


सोनिया गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रायबरेली येथे मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच सोनिया यांचे जावई रॉबर्ट वाड्रादेखील उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून पाचव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्वीट केले आहे की, रायबरेलीमधील जनतेप्रती माझ्या आईची श्रद्धा पाहून प्रत्येक नेत्याने आणि उमेदवाराने काहीतरी शिकायला हवं. लोकांची सेवा करणे, हे त्यांचे एकमेव राजकीय उद्दिष्ट आहे. ज्या लोकांना अशी संधी मिळते, त्यांनी जनतेचे आभार मानायला हवेत.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सोनिया म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2004 सालचा इतिहास विसरु नये. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेत येईल, असे अनेकांना वाटत होते. परंतु सर्वांची भाकितं काँग्रेसने खोटी ठरवली होती. त्यामुळे 2004 हे वर्ष मोदींनी कधीही विसरु नये, असा इशारा दिला आहे.