नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (16 मार्च) लोकसभेत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकारणी, राजकीय पक्ष हे फेसबुक आणि ट्विटरसारख्या जागतिक कंपन्यांचा वापर राजकीय कथनाला आकार देण्यासाठी करत आहेत, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. निवडणुकीच्या राजकारणातून फेसबुक आणि इतर सोशल मीडिया दिग्गजांचा पद्धतशीर हस्तक्षेप आणि प्रभाव संपुष्टात आणावा, असं त्यांनी सांगितलं.  सोबतच या सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना समान संधी देत नाही, असंही निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं.


स्वत:च्या फायद्यासाठी द्वेष पसरवला जातोय : सोनिया गांधी
वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात सांगितलं होतं की, फेसबुकने सत्ताधारी पक्षाची कशी साथ दिली होती. अशाच प्रकारचे आणखी बरेच दावे अहवालात करण्यात आले आहेत. यानुसार फेसबुकने स्वत:चे नियम मोडून सत्ताधारी पक्ष आणि सरकारची साथ दिली होती. चुकीच्या माहितीमुळे देशातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. कंपनीला ही बाब माहित आहे, परंतु आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर केला जात आहे," असं सोनिया गांधी यांनी लोकसभेत सांगितलं. 


सोनिया गांधी यांनी म्हटलं की, "भारताची लोकशाही आणि सामाजिक एकोपा बिघडवण्याचं काम अशा कंपन्या करत आहेत. आपण ते जतन करणे आवश्यक आहे." हे सर्व सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. याशिवाय त्यांनी अहवालाचा दाखला देत कॉर्पोरेट नेक्ससचाही उल्लेख केला. सोनिया गांधी म्हणाल्या की, हे आपल्या देशासाठी आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे."


मी सरकारला विनंती करते की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीच्या राजकारणातून फेसबुक आणि इतर सोशल मीडिया दिग्गजांचा पद्धतशीर हस्तक्षेप आणि प्रभाव संपुष्टात आणावा. हे पक्षपाती राजकारणाच्या पलीकडे आहे," असं सोनिया गांधी पुढे म्हणाल्या.


पाचही राज्यांच्या अध्यक्षांकडून राजीनामा मागितला
सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे.
यानंतर, पहिली कारवाई म्हणून, त्यांनी नुकत्याच निवडणूक पार पडलेल्या राज्यांच्या म्हणजे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. सोनिया गांधींच्या मागणीनंतर सर्व अध्यक्षांनी आपले राजीनामे काँग्रेस अध्यक्षांकडे पाठवण्यास सुरुवात केली आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनीही आपला एक वाक्याचा राजीनामा सोनिया गांधींना पाठवला आहे. प्रियांका गांधी स्वत: उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस आहेत आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोणत्याही प्रभारीचा राजीनामा मागितलेला नाही, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. सोनिया गांधी संघटनेच्या बळकटीसाठी आवश्यक निर्णय घेत आहेत, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं.