मुंबई: राज्यातील प्रकल्पांच्या प्रगतीवर नक्की कोणाची देखरेख असा प्रश्न मंत्रालयातील (Mantralaya) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या वॉर रुमच्या शेजारी नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट म्हणजेच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलं आहे. मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. 


 मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांची वॅार रुम आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये या वॅाररुमची स्थापना केली. या वॅार रुमच्या  माध्यमातून समृद्धी महामार्ग, पुण्यातील रिंग रोड किंवा विमानतळाची काम यासारख्या पन्नासहून अधिक प्रोजेक्टचा आढावा याच वॅाररुम मधून  मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरेंनी याचे नामांतर करून संकल्प कक्ष सुरू केला. आता सत्तांतर  झाल्यानंतर पुन्हा एकदा वॉररुम हे नाव कायम ठेवण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याच वॉर रूममधून प्रकल्पांच्याआढावाच्या काही बैठकाही घेतल्या. मात्र याच वॅार  रुमवरुन  सरकारमधये कोल्डवॅार सुरु झालंय का असा प्रश्न आता विरोधक विचारु लागले आहेत. 


मंत्रालयात मुख्यमंत्री वॅार रुम असताना सरकारमध्ये नव्याने दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटची स्थापना करून गुरुवारी या संदर्भातली बैठक घेतली. या बैठकीला मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एवढेच नाही तर मुख्यमंत्री वॅार रुमचे सर्वेसर्वा राधेश्याम मोपलावरही या बैठकीला उपस्थित होते आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा अजित पवारांनी घेतला. हा एकच आढावा नाही तर दर पंधरा दिवसांनी या प्रकल्पाबाबत ही बैठक घेतली जाणार आहे.  त्यामुळे अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण होते का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विकास कामांचा आढावा या बैठकीत घेतल्याचं सांगितले जातंय. हाच आढावा अजित पवार मागील सरकारच्या काळात ही घेत होते. मात्र त्यावेळी अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. मात्र आता अजित पवार हे पालकमंत्री नाहीत. त्याचसोबत फक्त पुण्यातीलच कामांचा  आढावा अजितदादांनी घेतला नाही तर राज्यातील इतर विकासकामांचाही आढावा घेण्यात आला आहे. अजित पवार यांच्याकडे वित्त खाते आहे. त्यांनी आढावा घेतलेल्या कामांचा तसा फारसा संबंध नसताना ही आढावा घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवलेल्या पाहायला मिळतात. यामुळे मंत्रालयातील सर्वच अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारे गोंधळ सुरूझालेला पाहायला मिळतोय. 


अजित पवार यांच्या नव्या खेळीमुळे प्रशासनावर कोण लक्ष ठेवणार व राज्यातील प्रकल्पावर नक्की कोणाचं नियंत्रण राहणार असा प्रश्न निर्माण झालाय .भविष्यात वॅार रुम विरुद्ध नियंत्रण कक्ष असा संघर्ष झाल्यास आश्चर्य वाटू नये.


हे ही वाचा :


मुख्यमंत्र्यांच्या वॉर-रूमवरून शिंदे आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा