काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असताना आज पुन्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका मेजरसर चार जवान शहीद झाले आहेत.
पिंगलानमध्ये सुरु असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरलं असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांकडून सुरु असलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.
रविवारी रात्री उशीरा पिंगलान परिसरात दहशतवादी घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर परिसरात शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. मध्यरात्री 3 वाजताच्या दरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबारात एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या घरात दोन ते तीन दहशतवादी लपले आहेत. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे, त्याचा पुलवामा हल्ल्याशी काही संबंध आहे का? याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
VIDEO | वायूदलाच्या युद्धाभ्यासानं पाकिस्तानला धडकी | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा