नवी दिल्ली : निवडणूक आयोगाचं ईव्हीएम हँकिंग चँलेंज स्वीकारण्यासाठी केवळ एकच पक्ष पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाचं आव्हान स्वीकारत अर्ज दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एव्हीएम घोळाबाबत आकांडतांडव करणाऱ्या आपनं हॅकेथॉनसाठी कोणताही अर्ज दाखल केला नाही. येत्या 3 जूनला निवडणूक आयोगाची हॅकेथॉन आयोजित करण्यात आली आहे.
ईव्हीएममध्ये छेडछाडच्या आरोपांनंतर 12 मे रोजी निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांची बैठक घेतली. यावेळी निवडणूक आयोगाच्या वतीनं पारदर्शी मतदानाबद्दल राजकीय पक्षांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच ईव्हीएममध्ये छेडछाड करणं कसं अशक्य आहे, याचं प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आलं. हॅकेथॉनसाठी केवळ राष्ट्रवादीनं अर्ज दाखल केला आहे, तर एव्हीएम घोळावर बोट ठेवणाऱ्या आप आणि बसपानं आव्हानापासून फारकत घेतली आहे.
यावेळी ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना आव्हान दिलं होतं. यासाठी आयोगानं सर्व पक्षांना पुन्हा आमंत्रित करुन निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना ईव्हीएम मशीन हॅक करुन दाखवावं असं, खुलं आव्हान दिलं होतं.