नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी सरकारने आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. या अधिवेशनात आम आदमी पार्टीचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी ईव्हीएम मशीनशी साधर्म्य असणाऱ्या मशीनवर डेमो सादर करुन ईव्हीएमशी छेडछाड केली जाऊ शकते, असा दावा केला. त्यावर निवडणूक आयोगानं आम आदमी पार्टीला आव्हान देऊन, हॅकेथॉनमध्ये ईव्हीएम छेडछाड सिद्ध करुन दाखवण्याचं सांगितलं आहे.
आम आदमी पार्टीच्या दाव्यावर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगानं सांगितलं की, खोट्या मशीनच्या आधारे कुणालाही फसवलं जाऊ शकतं. आपनं सादर केलेल्या डेमोत ईव्हीएम मशीन नसून, ईव्हीएम मशीनशी साधर्म्य असणारं मशीन आहे. त्यामुळे आपच्या या डेमोला महत्त्व नाही.
विशेष म्हणजे, ईव्हीएमच्या सुरक्षिततेसंदर्भात आयोगानं या महिन्याच्या शेवटी हॅकेथॉनचं आयोजन केलं आहे. यामध्ये पार्टीनं ईव्हीएम हॅक होणं सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हान दिलं आहे.
दरम्यान, आयोगाच्या वतीने 12 मे रोजी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलवली आहे. या बैठकीचं सात राष्ट्रीय आणि 48 प्रादेशिक पक्षांना निमंत्रण दिलं आहे. या बैठकीत ईव्हीएमच्या सुरक्षेसंदर्भात माहिती दिली जाणार आहे.
तर दुसरीकडे आम आदमी पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असून, आपचे आमदार आदर्श शास्त्री यांनी आम्हाला कोणतंही मशीन द्या, आम्ही ते 90 सेकंदात हॅक करुन दाखवू असं म्हणलं आहे. निवडणूक आयोगाच्या बैठकीसाठीही आमदार सौरभ भारद्वाज हेच पक्षाचं प्रतिनिधित्व करतील असंही आपनं स्पष्ट केलं आहे.
पंजाब विधानसभा आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यापासून आम आदमी पक्षाने सातत्याने ईव्हीएममध्ये छेडछाडीचा आरोप केला आहे. तर निवडणूक आयोगानं आपचे आरोप फेटाळून लावत मशीनमध्ये छेडछाड करणं अशक्य असल्याचं म्हणलं आहे.
संबंधित बातम्या
90 सेकंदात ईव्हीएम मशीन हॅक, आपकडून ईव्हीएम टेम्परिंगचा डेमो