नवी दिल्ली : ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमचा डेमो दाखवला आणि कुठल्याही परिस्थितीत इव्हीएम हॅक होऊ शकत नाहीत, असं स्पष्ट केलं.


महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक मतं पडल्यानं ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. दिल्ली आणि महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या विजयानंतर विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर ईव्हीएममधील कथित घोळाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी उचलून धरली होती.

ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीटी (मतदानाची पावती) जोडल्यामुळे मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल, त्यानंतर सगळ्या शंका दूर होतील, मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. झैदी यांनी सांगितलं. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि 'इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' या दोन भारतीय कंपन्या ईव्हीएम तयार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली महापालिकेत ईव्हीएमच्या कथित घोळाचा डेमो दाखवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानंच आज ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.