Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भाजपमधील अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेतल्या. शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सुरु झालेला भेटीचा सिलसिला शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर संपला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. राजधानी दिल्ली येथील 7, लोककल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठुमाऊलीची मूर्ती भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारपासून दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सदिच्छ भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या नियोजित भेटीआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या प्रगतीत केंद्र सरकारच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत काही फोटोही पोस्ट केले आहेत.
राष्ट्रपती यांची सदिच्छा भेट घेतली
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची 6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहचतील असं सांगण्यात आलं आहे. पुणे विमानतळावरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील.