लखनऊमृतदेहाला हिंदू-मुस्लिमांनी खांदा दिल्याची घटना आपण अनेकवेळा पाहिली-ऐकली आहे. मात्र उत्तरप्रदेशातील अंत्ययात्रेची घटना अत्यंत वेगळी आहे. एका युवकाच्या मृत्यूनंतर हिंदू-मुस्लिम सौहार्दाचं अनोखं नातं उत्तर प्रदेशातील मुरादाबादेत पाहायला मिळालं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रिझवान उर्फ चमन नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. मात्र या तरुणावर दोन कुटुंबाचा दावा होता. यापैकी एक कुटुंब हिंदू, तर दुसरं मुस्लिम आहे.

दोन्ही कुटुंब या तरुणावर आपला दावा करत होते. गेल्या चार वर्षांपासून हा वाद सुरु होता. मृत्यू झालेला तरुण मतिमंद होता.

दोन्ही कुटुंबं संयुक्तपणे या तरुणाचं पालन पोषण करत होते. या तरुणाचा ताबा काही दिवस हिंदू कुटुंबाकडे तर काही दिवस मुस्लिम कुटुंबाकडे  होता. दोन्ही कुटुंब त्याची देखभाल करत होते.

तीन दिवसांपूर्वी आजारपणामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. त्यावेळी तो हिंदू कुटुंबाकडे राहात होता.

मृत्यूनंतर हिंदू कुटुंबाने त्या तरुणाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. त्यावेळी मुस्लिम कुटुंबाने आपल्या धर्माप्रमाणे मृतदेहाचं दफन करण्याचं ठरवलं.

त्यावरुन दोन्ही कुटुंबाची वादावादी झाली. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन, दोन्ही कुटुंबांनी समजुतीने अंत्यसंस्कार करावं, अशी सहमती झाली.

यानंतर चमन ऊर्फ रिझवानची अंत्ययात्रा निघाली. महत्त्वाचं म्हणजे चमनला अखेरचा निरोप देण्यासाठी हिंदू तर रिझवानसाठी मुस्लिम मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले.

अंत्ययात्रेत अल्लाह हो अकबर आणि राम नाम सत्य है असं ऐकायलं येत होतं. कोणी टोपी घालून, तर कोणी टिका लावून अंत्ययात्रेत सहभागी झालं.

यानंतर अंत्ययात्रा स्मशानभूमीत न्यायची की दफनभूमीत/कब्रस्तानमध्ये असा प्रश्न पोलिसांसमोर होता.

त्यावरही तोडगा काढत मृतदेह हिंदू स्मशानभूमीत नेण्यात आला. तिथे एकीकडे चितेची तर दुसरीकडे दफनविधीची तयारी सुरु होती. त्यावेळी पोलिसांची मोठी फौजही उपस्थित होती.

मात्र प्रेताला अग्नी द्यायचा की दफन करायचं यावर रात्री तोडगा निघाला. हिंदू स्मशानभूमीत मुस्लिम रितीप्रमाणे मृतदेह दफन करण्यात आला.