मुंबई: आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर, पाकिस्तानात त्यांच्या वकिलांची छी-थू होत आहे. जाधव हे केवळ स्पाय-स्पाय असल्याचं सांगून, टेंबा मिरवणाऱ्या वकिलांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयातील अज्ञान जगासमोर आल्याची भावना पाकिस्तानात व्यक्त होत आहे.
'द डॉन' या वृत्तपत्राने आपल्या वेबसाईटवर पाकिस्तानातील माजी न्यायाधीशांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय कोर्टाला कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचा अधिकार नाही, असं पाकिस्तानी तज्ज्ञ निकालापूर्वी छातीठोकपणे सांगत होते. मात्र तेच आता पाकिस्तानचा युक्तीवाद फुसका ठरल्याचं सांगत आहेत, असं 'द डॉन'ने म्हटलं आहे.
खवर कुरेशी यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानची बाजू मांडली.
'तीच पाकची चूक होती'
पाकचे माजी न्यायमूर्ती शेख उस्मानी यांच्या मते, "हा निर्णय म्हणजे धोक्याची घंटा आहे. हे आंतरराष्ट्रीय कोर्टाचे कार्यक्षेत्रच नाही. पाकिस्तानी कोर्टाने या खटल्यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्टात हजरच राहायला नको होतं. तीच पाकिस्तानची चूक होती. हा प्रकार म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा होता"
पाकिस्तानचा अभ्यासच नव्हता
लंडननिवासी पाकिस्तानी वकील रशीद अस्लम यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या ज्ञानावर टीकास्त्र सोडलं.
या खटल्यात पाकिस्तानची तयारी खूपच कमकुवत आणि तोकडी होती. इतंकच नाही तर पाकिस्तानला युक्तीवाद करण्यासाठी 90 मिनिटांचा अवधी होता, मात्र त्यांनी तब्बल 40 मिनिटे वाया घालवली, असं अस्लम म्हणाले.
केवळ 50 मिनिटात आपण युक्तीवाद थांबवणे हे खूपच आश्चर्यजनक होतं. भारताला खोटं ठरवण्यासाठी खवर कुरेशी यांनी पूर्ण वेळ वापरायला हवा होता. त्यांनी वेळ वाया घालवणं आपल्याला परवडणारं नाही, असंही अस्लम यांनी नमूद केलं.
व्हिएन्ना करारातील कलम 5B नुसार, जर एखाद्या नागरिकाला पकडल्यास, तो मानवाधिकार कायद्यासाठी पात्र आहे, पण तो स्पाय किंवा हेर असेल तर त्याला तो अधिकार मिळत नाही. त्यामुळे आपण युक्तीवाद करण्यास कमी पडलो, असं अस्लम म्हणाले.
पाकिस्तानी खटला 'विक'
पाकिस्तानातील राजकीय पक्ष पीपीपीचे नेते शेरी रहमान यांच्या मते, "आपण केवळ हा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या कार्यक्षेत्रात येतो की नाही याबद्दलच बोलत बसलो. त्याऐवजी ते स्पाय आहेत, हे सांगणं आवश्यक होतं.
संबंधित बातम्या
कुलभूषण जाधव यांची बाजू मांडणाऱ्या हरिश साळवेंची फी किती?
अंतिम निकालापर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही : कोर्ट
व्हिएन्ना करार नेमका काय आहे?