ED Notice To Sonia Gandhi : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसने हे सूडाचं राजकारण असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आम्ही ईडीच्या नोटीशीला घाबरणार नसल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. आम्ही या नोटीशीला घाबरणार नाही आणि केंद्र सरकारसमोर झुकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी चौकशीला सामोरे जाणार
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. आठ जूनपर्यंत राहुल गांधी परतल्यास तेही चौकशीला सामोरे जातील. अन्यथा ईडीकडे वेळ मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरजेवाला यांची ईडीवर टीका
पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी ईडीवर निशाणा साधला. या कटामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची पाळीव यंत्रणा ईडी आहे. सूडाच्या भावनेत मोदी सरकार आंधळी झाली असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र 1942 मध्ये स्थापन करण्यात आले होते. त्यावेळेस ब्रिटीश सरकारने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आणि आता मोदी सरकार ईडीचा वापर करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी समोर हजर न राहण्याचा पर्याय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर आहे. पहिल्या नोटीसला उत्तर न देता त्याकडे दुर्लक्ष करता येईल. अशा स्थितीत ईडीकडून त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात येईल. दुसरा पर्याय म्हणजे ईडीच्या नोटिशीला कोर्टात आव्हान देण्याचा मार्ग त्यांच्यासमोर आहे.
प्रकरण काय?
नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केले होते. हे काँग्रेसचं मुखपत्र समजले जायचे. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडले. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या 'यंग इंडिया' या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरू करण्यात आले नव्हते. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे.