Anand Mohan Released: बिहारचे (Bihar) माजी खासदार आनंद मोहन सिंहची गुरुवारी (27 एप्रिल) पहाटे 4:30 वाजता तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगाचे नियम बदलून गुंड प्रवृत्तीतून राजकारणी झालेल्या आनंद मोहन सिंहच्या सुटकेचा मार्ग मोकळा केल्याबद्दल आता बिहार सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. आनंद मोहन सिंह हे आयएएस (IAS) अधिकारी आणि तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी जी. कृष्णैय्या यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
आनंद मोहन सिंहने चिथावणी दिलेल्या जमावाने 1994 साली आयएएस (IAS) जी. कृष्णैय्या (G. Krishnaiah) यांची हत्या केली होती. त्यांना त्यांच्या गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केल्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. 1985 बॅचचे आयएएस अधिकारी जी. कृष्णैय्या हे तेलंगणातील महबूबनगरचे रहिवासी होते. या प्रकरणात आनंद मोहनला 2007 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. एका वर्षानंतर म्हणजेच, 2008 मध्ये पाटणा उच्च न्यायालयाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली.
बिहार सरकारने नुकतेच अटकेत असलेल्या कैद्यांच्या सुटकेचे नियम बदलले आणि मोठ्या गुन्ह्यांतील 27 कैद्यांच्या सुटकेची अधिसूचना जारी केली होती. बिहार सरकारच्या निर्णयानंतर माजी खासदार आनंद मोहन सिंह याची तुरुंगातून सुटका झाली. IAS च्या हत्येतील दोषी आनंद मोहन सिंह हा मागील 15 वर्षांपासून तुरुंगात होता.
सुटकेवर आनंद मोहन सिंहची काय होती प्रतिक्रिया?
आनंद मोहन याने शिक्षेच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते, मात्र आजपर्यंत कोणताही दिलासा न मिळाल्याने तो सहरसा तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याची पत्नी लवली आनंद याही लोकसभा खासदार राहिल्या आहेत, तर त्याचा मुलगा चेतन आनंद बिहारमधील शिवहारमधून आरजेडीचा आमदार आहेत. आनंद मोहनच्या सुटकेवर झालेल्या गदारोळाला उत्तर देताना त्याने भाजपवर टीकास्त्र सोडले. "गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील काही दोषींची सुटका झाली आहे. तेही नितीश-आरजेडीच्या दबावामुळेच का?" असा मिश्कील सवाल आनंद मोहन सिंहने केला.
15 दिवसांच्या पॅरोलनंतर कालच परतला होता तुरुंगात
आनंद मोहन सिंह त्याचा मुलगा, आमदार चेतन आनंदच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी 15 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर तो 26 एप्रिलला सहरसा कारागृहात परतला होता आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 एप्रिलला त्याची सुटका झाली.
संबंधित बातम्या: