मुंबई : देशात लॉकडाऊनदरम्यान बस, रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर देशांतर्गत विमान सेवाही सुरु झाली आहे. 60 दिवसांनी म्हणजेच दोन महिन्यांनंतर विमानांनी आज टेकऑफ केलं. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी पुण्याच्या दिशेने पहिल्या विमानाने उड्डाण केलं. हे विमान इंडिगोचं होतं. तर मुंबईवरुन पहिल्या विमानाने पाटणाच्या दिशेने सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण केलं. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 24 मार्चपासून हवाई वाहतूक रोखण्यात आली होती.


सुरुवातीच्या टप्प्यात 2800 उड्डाणांचं नियोजन करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशात मध्यरात्रीपासून प्रवाशांची ये-जा सुरु झाली होती. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर उत्साह तर होता. परंतु मनात कोरोनाची भीती असल्याचंही काही प्रवाशांनी सांगितलं.


विमानतळावर विशेष तयारी
यासाठी विमानतळांवर विशेष तयारी करण्यात आली होती. प्रवासी रात्रीपासूनच प्रवाशांची गर्दी दिसली. सोशल डिस्टन्सिंगसाठी विमानतळावर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. ते प्रवाशांना सातत्याने डिस्टन्स ठेवण्याची सूचना करत होते. विमानतळावर सातत्याने उद्घोषणा केल्या जात होत्या. सोबतच सर्व प्रवासी मास्क परिधान केलेले दिसत होते.



विमानतळावर सॅनिटायजर, पीपीई किट्स आणि मास्क खरेदीची सोय
सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी आसनव्यवस्थेतही बदल करेला आहे. प्रवाशांना एक खुर्ची सोडून बसावं लागणार आहे. सोबतच सर्व प्रकारच्या तपासणी करुनच प्रवाशांना आत सोडलं जात आहे. विमानतळावर सॅनिटायजर, पीपीई किट्स, मास्क्स यांसारखी साधनं उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


'मिशन वंदेभारत' कोणताही परिणाम नाही
परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरु असलेलं 'मिशन वंदेभारत'वर कोणताही परिणाम होणार नाही. हे अभियान सुरुच राहणार आहे.


विमान प्रावासादरम्यान कोणत्या सूचनांचं पालन करणं गरजेचं?


- विमान प्रवास करताना उड्डाणाच्या दोन तास आधी विमानतळावर हजर राहणं गरजेचं


- प्रवास करताना मास्क, हॅण्ड ग्लोव्ह्ज परिधान करणे आवश्यक


- कमीत कमी सामान सोबत ठेवून एक व्यक्ती 1 हॅण्ड बॅग आणि एक मोठी बॅग सोबत घेऊ शकतो


- विमान प्रवास करत असताना दोन वेळा थर्मल स्क्रीनिंग करुन विमानात प्रवेश


- लक्षण आढळणाऱ्या व्यक्तीसाठी काही विमानतळावर क्वॉरन्टाईन सेंटरची वेगळी सुविधा


- प्रवासादरम्यान खाण्याची सोय नसणार, विनंती केल्यास पाणी प्यायला दिलं जाणार


- वय वर्ष14 वर्षावरील व्यक्तीला आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक


- 80 वर्षां जास्त वयाचे व्यक्ती, गर्भवती, आजारी व्यक्तींना विमानप्रवास न करण्याचा सल्ला मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलाय


- कमीत कमी संपर्क कसा होईल या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याचा सूचना


- विमान प्रवास केल्यास दुसऱ्या शहरात गेल्यावर कमीत कमी लक्षणानुसार कमीत कमी 7 ते 14 दिवस क्वॉरन्टाईन होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग रोखता येईल.


Domestic Flights Resume | आजपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु, मुंबई विमानतळावर काय स्थिती?