नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मॅक्स मोबाईल विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. डिसेंबर 2012 मध्येच करार संपूनही कंपनी आपल्या नावाचा वापर ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करत असल्याचा आरोप धोनीने केला आहे.

धोनीच्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने मॅक्स मोबिलिंक प्रायव्हेट लिमिटेडच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे. 'तुम्ही आदेशाचं पालन का करत नाही?' असा सवाल कोर्टाने विचारलं आहे. 21 एप्रिल 2016 रोजी हायकोर्टाने करार संपल्यामुळे धोनीच्या नावाचं वापर न करण्यास बजावलं होतं.

जाहिरातीत आपल्या नावाचा वापर केलेली मॅक्स मोबाईलची प्रॉडक्ट्स विकण्यास बंदी घालण्याची मागणी धोनीने 17 नोव्हेंबर 2014 रोजी केली होती. त्यानंतर यावर काय पावलं उचलली गेली, अशी विचारणा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोर्टाने कंपनीचे सीएमडी अजय अगरवाल यांना केली होती. मात्र अद्यापही हा प्रकार न थांबल्याने पुन्हा धोनीने कोर्टाचे दरवाजे ठोठावले.

कंपनीने मात्र कुठल्याही फायद्यासाठी धोनीच्या नावाचा गैरवापर केला नसल्याचा दावा केला आहे. धोनी आणि मॅक्स कंपनीचा करार डिसेंबर 2012 मध्येच संपुष्टात आला होता. त्यानंतर फेसबुक, वेबसाईट अशा मॅक्सच्या सोशल मीडियावरुन धोनीचे फोटो हटवण्यास कोर्टाने सांगितलं होतं.

करार संपल्यानंतरही आपला फोटो वापरल्याबद्दल धोनीकडून 2014 मध्ये कोट्यवधींची भरपाई मागण्यात आली होती. मॅक्सचे सर्व मोबाईल प्रॉडक्ट्स जप्त करण्याची मागणीही धोनीने याचिकेत केली होती.