Dr.Jitendra Singh : आता समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर होणार आहे. समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलं असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Dr.Jitendra Singh) यांनी दिली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी याबाबची माहिती दिली. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology-NIOT)  या आपल्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर केल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.


दर दिवशी 1 लाख लिटर पिण्यायोग्य पाणी बनवण्याची क्षमता


पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान या आपल्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी लो प्रेशर थर्मल डीसालायनेशन (LTTD)  तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिण्यायोग्य पाण्याचा यशस्वी प्रयोग लक्षद्वीप बेटावर यशस्वीपणे करण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच्या कावारात्ती, अगाती आणि मिनीकॉय बेटांवर LTTD तंत्रज्ञानावर आधारित तीन डीसलायनेशन प्लांट विकसित करण्यात आले आहेत. यापैकी प्रत्येक LTTD प्लांटची दर दिवशी 1 लाख लिटर पिण्यायोग्य पाणी बनवण्याची क्षमता आहे.


या ठिकाणी प्लांट्सची स्थापना करण्याचे काम सुरु


या प्लांट्सच्या यशाच्या आधारावर गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच्या माध्यमातून अमिनी, अन्द्रोथ, चेटलेट, कादमात, काल्पेनी आणि किलतान या ठिकाणी दिवसाला 1.5  लाख लिटर क्षमतेच्या  आणखी 6 LTTD प्लांट्सची स्थापना करण्याचे काम सोपवले आहे. LTTD तंत्रज्ञान लक्षद्वीप बेटांसाठी योग्य आढळून आले असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाणी आणि खोल समुद्राचे पाणी यांच्या तापमानातील सुमारे 15⁰C इतका आवश्यक फरक आतापर्यंत केवळ लक्षद्वीप किनारपट्टी परिसरातच आढळून आला आहे.


समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणाऱ्या निर्मिती प्रकल्पाची (डीसालायनेशन प्लांट) किंमत अनेक घटकांवर अवलंबून आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आणि प्रकल्पाचे स्थान याचा यात समावेश आहे. लक्षद्वीप येथील सहा LTTD प्लांटची एकूण किंमत 187.75 कोटी रुपये इतकी आहे.