Vistara Flight Bomb Threat : दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानात बाँब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्यावर तातडीने कारवाई करत तपासणी मोहीम सुरू केला. हे विमान श्रीनगरमध्ये लँड झाल्यानंतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. नंतर धमकीचा तो कॉल फेक असल्याचं समोर आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. हा कॉल कुणी आणि का केला याचा तपास आता सुरू आहे. 


दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. त्यामध्ये 177 प्रवासी प्रवास करत होते. बाँबची धमकी मिळाल्यानंतर विमान कंपनी आणि सुरक्षा दलांनी यावर तातडीने कारवाई केली. फ्लाइट क्रमांक UK-611 दुपारी 12.10 वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.


विमानाचे ताबडतोब आयसोलेशन


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विस्तारा फ्लाइट UK611 नवी दिल्लीहून येत होती आणि त्यामध्ये बाँब ठेवल्याच्या धमकीच्या कॉलनंतर, श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ कारवाई केली. हा कॉल एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) श्रीनगरला प्राप्त झाला. अशा धमक्यांसाठी असलेल्या मानक प्रोटोकॉलचे पालन करून, विमान लँडिंग केल्यावर ताबडतोब त्याचे आयसोलेशन करण्यात आलं आणि विमान एका निर्जन भागात नेण्यात आले. या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी परिस्थिती प्राधान्याने हाताळली गेली.


 






विमानात कोणतीही स्फोटके सापडली नाहीत


विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सर्व प्रवाशांना आयसोलेशन बे येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सर्व सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून विमानाची कसून सुरक्षा तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले. विमानाची तपासणी करण्यासाठी बॉम्ब निकामी पथके तैनात करण्यात आली आणि कसून शोध घेतल्यानंतर विमानात कोणतीही स्फोटके आढळून आली नाहीत.


विमानसेवा पुन्हा सुरू झाली


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट कॉल आल्यानंतर श्रीनगर विमानतळावरील फ्लाईट ऑपरेशन दोन तासांपेक्षा जास्त काळ थांबवण्यात आले होते. आता विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. हा कॉल नेमका कुठून करण्यात आला आहे याचा तपास आता यंत्रणा करत आहे. तसेच हवाई प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना आखल्या जात आहेत.


ही बातमी वाचा: