Continues below advertisement

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एक मोठा स्फोट (Delhi Red Fort Blast ) झाल्याची माहिती समोर आली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक कार उभी होती, त्या कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. या स्फोटात काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामागचं कारण काय याचा तपास केला जात आहे.

सोमवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेचच फायर ब्रिगेड या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलं. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त 800 मिटर अंतरावर आहे. त्यामुळे या स्फोटाकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे.

Continues below advertisement

लाल किल्ल्याचा हा परिसर म्हणजे नेहमीच गजबजलेला असतो. विशेषतः सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. अशावेळी हा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. 

High Alert In Delhi : दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी

या स्फोटानंतर लाल किल्ला परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. सुरक्षा यंत्रणांनी या परिसराचा ताबा घेतला आहे. त्यानंतर एनएसजीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ पार्किंमध्ये असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या घटनेनंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Delhi Red Fort Blast : दहशतवादी स्फोटाची शक्यता

गेल्या चार दिवसात, 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली पोलिसांनी कारवाई करत काही संशयितांना पकडले आहे. त्यामध्ये आयसिसच्या चार दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकंही जप्त करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटामुळे संशय अधिक बळावला आहे.