नवी दिल्ली : भीमा कोरेगाव दंगल आणि शहरी नक्षलवाद्यांशी संबंध याप्रकरणी प्राध्यापक आरोपी आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मात्र त्यांना अटकेपासून चार आठवड्यांचा अंतरिम दिलासा देण्यात आला आहे.


तेलतुंबडे या काळात जामिनासाठी अर्ज करु शकतात.आनंद तेलतुंबडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. चौकशीच्या या टप्प्यात दखल देऊ शकत नसल्याची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली आहे.


शहरी नक्षलवाद प्रकरणी पुणे पोलिसांनी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्यासह अन्य 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरु असून यातील अनेकांना अटकही करण्यात आली आहे.


आनंद तेलतुंबडे हे सध्या गोव्यातील एका शैक्षणिक संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांच्या पुण्यातील घरावर छापा मारला होता. मात्र त्यांना ते तिथे सापडले नाहीत. सरकारी वकिलांनी तो छापा नसून केवळ औपचारिक भेट असल्याचं हायकोर्टात सांगितलं होतं.