Delhi Crime :  दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने आंतरराष्ट्रीय बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. फिरोज शेख आणि मुफज्जुल शेख अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. स्पेशल सेलनुसार हे दोघेही बांगलादेश सीमेवरून बनावट नोटा भारतात पुरवत होते.


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे डीसीपी जसमीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत या दोन्ही आरोपींनी भारतात सुमारे 2 कोटी रुपयांच्या बनावट नोटांचा पुरवठा केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा अशा प्रकारे बनवल्या जात आहेत. ज्यामध्ये खऱ्या नोटा कोणत्या आणि खोट्या कोणत्या यामध्ये फरक करणे खूप कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले. 


ऑक्टोबरमध्ये माहिती होती मिळाली
ऑक्टोबरमध्ये सेलच्या टीमला बांगलादेशातून पश्चिम बंगाल सीमेवरून भारतात बनावट नोटांचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाली होती. या रॅकेटवर सेलची टीम कामाला लागली होती. तपासात फिरोज शेख आणि मुफज्जुल शेख अशी दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही बनावट नोटांचा पुरवठा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 21 डिसेंबरला आरोपी दोघेही दिल्लीत बनावट नोटा पुरवणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सेलच्या पथकाने कालका जी परिसरात सापळा रचला आणि बनावट नोटा घेऊन दोघे पोहोचले असता दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.


देशातील अनेक भागात बनावट नोटांचा पुरवठा 
अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. यावेळी आरोपी फिरोजने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने मुर्शिदाबाद येथील रहिवासी असलेल्या सलाम नावाच्या व्यक्तीकडून आठ लाखांच्या बनावट नोटा घेतल्या होत्या. या नोटा दिल्लीत पुरवायच्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत या दोन्ही आरोपींनी देशातील विविध भागात बनावट नोटांचा पुरवठा केला आहे. एक लाखाच्या बनावट नोटा 30 हजार रुपयांना विकत घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यानंतर 40 ते 45 हजार रुपयांना विकायचे. गेल्या दोन वर्षांत दिल्लीसह विविध राज्यांमध्ये 2 कोटींच्या बनावट नोटांचा पुरवठा करण्यात आल्याचेही चौकशीत उघड झाले आहे.


बांगलादेशातून भारतात बनावट नोटांचा पुरवठा 
स्पेशल सेलच्या म्हणण्यानुसार, 2016 मध्ये देशात नोटाबंदी झाली तेव्हा बांगलादेश आणि पाकिस्तानमधून बनावट नोटांचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. परंतू, आता गेल्या 4 वर्षांपासून बनावट नोटांचे सिंडीकेट पुन्हा सक्रिय झाले आहेत. बनावट नोटांचा पुरवठा सुरू झाला आहे. बनावट नोटांची ही खेप पाकिस्तानमधून नेपाळ, नेपाळमधून बांगलादेश आणि बांगलादेशातून भारताला पुरवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.