रायपूर : आई-वडिलांची औषधं आणायला गेलेल्या एका युवकाला कानशिलात लावून त्याला पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचं तात्काळ निलंबन करावं असा आदेश मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलाय. तसेच या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, "सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी एका युवकाशी गैरव्यवहार केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. ही घटना अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे वर्तन कधीही सहन केलं जाणार नाही. जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांना तात्काळ निलंबित केलं जात आहे."
मुख्यमंत्री भूपेश बघेल पुढे म्हणाले की, "प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशा प्रकारचे वर्तन स्वीकाहार्य नाही. या घटनेमुळे मला वेदना झाल्या आहेत. मारहाण झालेल्या त्या तरुण आणि कुटुंबाप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो."
छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यामध्ये औषधं आणण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मोबाईल फोडून त्याला कानशिलात लावली आणि नंतर त्याला पोलिसांकडून मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून मुख्यमंत्र्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती.
सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृत्यावर आयएएस असोसिएशनने नाराजी व्यक्त केली असून त्यांचं कृत्य नागरी सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chhattisgarh : औषधं आणायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोडला, कानशिलात हाणली; जिल्हाधिकाऱ्यांची अरेरावी कॅमेरात कैद
- Chhattisgarh : सुरजपूर जिल्हाधिकाऱ्यांचे 'ते' कृत्य सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात, IAS Association ने व्यक्त केली नाराजी
- Coronavirus Lockdown : 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले महत्त्वाचे संकेत