नवी दिल्ली: दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील ज्युनिअर महिला कबड्डी खेळाडूनं प्रशिक्षकावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित तरुणीनं याप्रकरणी दिल्लीच्या मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आरोपी प्रशिक्षक फरार असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

पीडित तरुणीनं दिलेल्या जबाबानुसार, 9 जुलैला ती छत्रसाल स्टेडिअममध्ये गेली होती. तिथं एक व्यक्ती होता ज्याचं वय जवळजवळ 40 वर्ष होतं. तो कबड्डी प्रशिक्षक होता.त्यानेच काही बहाणा करत तरुणीला आपल्या जीपमध्ये बसवलं आणि काही अंतर दूर गेल्यानंतर तिच्या मानेवर जोरदार प्रहार केला. ज्यामुळे तरुणी बेशुद्ध झाली.

जेव्हा तिला शुद्ध आली त्यावेळी ती एका फ्लॅटमध्ये होती. पीडित तरुणीच्या मते, आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला रस्त्यात सोडून दिलं. तसेच याप्रकरणी कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही दिली. त्यानंतर तो तिथून फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे.