नवी दिल्ली : दिल्ली सरकारने तंबाखू, गुटखा ,पान मसाला, खैनी आणि जर्दाच्या खरेदी विक्री, आणि साठवणुकीवर एक वर्षांची बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा विभागाने गुरुवारी यासंदर्भात सूचना जारी केली आहे.
या सूचनेनुसार सुट्ट्या तंबाकूच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
तंबाखू, गुटखा, पान मसाल्याचं उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा विक्री तसंच खरेदीवर एक वर्षांची बंदी असेल. या बंदीची अंमलबजावणी सुरु आहे की नाही, हे तपासण्यासाठी दिल्ली पोलिसांचं पथक आरोग्य विभागासह छापाही टाकू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली सरकारने सप्टेंबर 2012 मध्ये बंदीची अध्यादेश जारी केला होता. मात्र त्यामध्ये गुटखा या शब्दाचा उल्लेख होता. त्यामुळे विक्रेते तंबाखूच्या माध्मातून इतर उत्पादनांची विक्री करत होते.
मात्र आता दिल्ली सरकारने तंबाखूसह सगळ्या हानीकारक उत्पादनांवर बंदी घातली आहे.