नवी दिल्ली : दिल्ली सरकारने बुधवारी 18 जानेवारीपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्री-बोर्ड पूर्वतयारी आणि प्रॅक्टिकल कामांसाठी राज्यातील सर्व शाळा खुल्या करण्यास परवानगी दिली आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले होते की पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाईल.


शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची नोंद ठेवली जाणार आहे. मात्र, ही नोंद उपस्थिती लावण्याच्या उद्देशाने वापरली जाणार नाही. कारण, शाळेत येणे हे पालकांच्या इच्छेनुसार पर्यायी असणार आहे. कोविड -19 साथीच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी राजधानी दिल्लीतील सर्व शाळांवर मागील वर्षी मार्चपासून बंदी घालण्यात आली होती. तब्बल 10 महिन्यांनंतर पहिल्यांदाच विद्यार्थी शाळेच्या आवारात परतणार आहेत.




शिक्षण संचालनालयाने बुधवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “प्री-बोर्डाच्या तयारी व प्रॅक्टीकल कामांमुळे राजधानी दिल्लीतील सर्व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 18 जानेवारीपासून शाळेत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरसह पालकांच्या परवानगीने शाळेत बोलावण्यात येत आहे. या काळात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.


जर केंद्राने मोफत कोरोना लस दिली नाही तर आम्ही देऊ, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा




दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीट केले की, “सीबीएसई बोर्ड परीक्षा आणि दिल्ली येथील अभ्यासक्रम पाहता प्रॅक्टीकल, प्रकल्प, समुपदेशन इ. साठी 18 जानेवारीपासून दहावी आणि बारावीच्या वर्गांसाठी शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. फक्त पालकांच्या संमतीनेच मुलांना बोलावले जाणार आहे. मुलांना येण्यास भाग पाडले जाणार नाही."