नवी दिल्ली : कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून देशात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्यांना ही लस उपलब्ध करून देण्याबाबत मोठे विधान केले आहे. केजरीवाल म्हणाले आहेत की जर केंद्राकडून ही लस विनामूल्य मिळाली नाही तर आम्ही मोफत लस देऊ.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे की आपला देश अत्यंत गरीब आहे आणि ही महामारी 100 वर्षांत प्रथमच आली आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना ही लस परवडणार नाही. माझं केंद्राला आवाहन आहे, की "ही लस देशभरात विनामूल्य उपलब्ध करुन द्यायला हवी. यावर केंद्र काय निर्णय घेतंय हे आम्ही पाहणार आहे. जर केंद्र सरकाराने दिल्लीतील लोकांना मोफत लस देण्यास नकार दिला तर आम्ही दिल्लीच्या लोकांना विनामूल्य उपलब्ध करुन देऊ."
पीएम मोदी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात करणार आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी को विन अॅपची देखील सुरू करणार आहेत. कोरोना लस देशभरात पोहोचवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींना सध्या मंजुरी देण्यात आली आहे.
लसीची किंमत किती आहे?
सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणाले की, ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेका लसीच्या खाजगी बाजारात कोविशिल्ड लसीची किंमत प्रति डोस 1000 रुपये असेल. ते म्हणाले, “आम्ही सरकारला प्रति डोस 200 रुपये विशेष दराने लस दिली आहे, जे सुरुवातीच्या 10 कोटी डोससाठीचे दर असेल. परंतु, खाजगी बाजारपेठेत आम्ही ही लस प्रतिडोस 1000 रुपये दराने देऊ. भारत सरकारकडून या लसींच्या किंमतींबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.