Delhi Liquor Shops Rule : राजधानी दिल्लीतील तळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे. दिल्ली सरकारने ड्राय डेच्या दिवसांमध्ये मोठी कपात केली आहे. धार्मिक उत्सव, महान नेत्यांची पुण्यातिथी आणि जयंती मिळून वर्षभरात 21 ड्राय डे होते. या दिवशी दारु विक्री आणि दारु पिण्यावर प्रतिबंध होता. पण आता दिल्ली सरकारने 2022 मधील ड्राय डेच्या संख्येत घट करुन तळीरामांना खुशखबर दिली आहे. 


 दिल्ली सरकारने वर्षभरातील ड्राय डेची संख्या फक्त तीनवर आणली आहे. याआधी राजधानी दिल्लीमध्ये वर्षभरात एकूण 21  ड्राय डे होते. पण आता दिल्लीमधील केजरीवाल सरकारने यंदाच्या वर्षभरासाठी ड्राय डेची संख्या तीन केली आहे. मुंबईत एकूण 29 ड्राय डे आहेत. राजधानी दिल्लीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि दोन ऑगस्ट गांधी जयंती या तीनच दिवशी ड्रायडे असणार आहे. या तीन दिवशी राजधानीमध्ये दारु विक्री आणि दारु पिण्यावर प्रतिबंध असणार आहे. सरकारच्या आदेशानुसार, या तीन दिवशी  L-15 लायसन्स असणाऱ्या हॉटेलमध्ये विक्रीवर बंदी नसणार आहे. 


 दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी ड्राय डे संदर्भात आदेश जारी केला आहे. उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटलेय की, दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010 च्या 52 व्या नियमांनुसार, हा आदेश दिला जातोय की वर्ष 2022 साठी दिल्लीत दिल्लीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि दोन ऑगस्ट गांधी जयंती या तीन दिवशी ड्राय डे म्हणून पाळला जाईल. L-15 लायसन्स असणाऱ्या हॉटेलमध्ये या तीनही दिवशी दारु विक्रीवर बंदी नसेल.


उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मार्च 2021 मध्ये ड्राय डेची संख्या घटवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार, राज्यातील ड्राय डेची संख्या कपात करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली सरकारने नुकतेच कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी राज्यात निर्बंध लावण्यात आले होते. त्यानुसार, दारु विक्री रात्री आठ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला होता.