Delhi Crime News : हेरगिरीच्या आरोपाखाली अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पैशांच्या मोबदल्यात इतर देशांना गोपनीय माहिती पाठवत असल्याचं उघड झाले आहे. हा कर्मचारी पैशांच्या मोबदल्यात देशाच्या अर्थ मंत्रालयातील गोपनीय माहिती इतर देशांना पुरवत होता. सुमीत असं कर्मचाऱ्याचं नाव आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार, सुमीत हा अर्थ मंत्रालयात कंत्राटी कर्मचारी आहे. सुमितकडून पोलिसांनी एक फोन जप्त केला आहे. त्या फोनद्वारेच तो हेरगिरीची कामे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ऑफिशियल सिक्रेट कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.


अर्थ मंत्रालयातील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी


सुमीत ही संवेदनशील माहिती कोणाला पुरवत होता? त्यामागे नेमकं कारण काय आहे? याची चौकशी पोलीस करत आहे. तसेच मंत्रालयात तैनात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. सुमीतसह अजून कोणी कर्मचारी गोपनीय माहिती पुरवत आहे का? याचीही चौकशी केली जाणार आहे. ऑफिशियल सीक्रेट कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.


अर्थसंकल्पापूर्वी ही अटक झाल्यामुळे हेरगिरीचा संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जर बजेटशी संबंधित डेटा लीक झाला तर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.


चंदीगडमध्येही केली होती अटक?


काही दिवसांपूर्वी 'पाकिस्तान एजन्सी आयएसआयसाठी काम करण्याऱ्या एका व्यक्तीला पंजाब पोलिसांनी चंदीगडमध्ये अटक केली होती. पोलीस अधिकारी गुरूचरण सिंह आणि इन्स्पेक्टर मनप्रीत सिंह यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सेलच्या एका टीमने त्याला अटक केली होती. त्रिपेंदर सिंह असे आरोपीचे नाव होते. त्रिपेंदर सिंह अनेक वर्षांपासून चंदीगडच्या सेक्टर 40 मध्ये राहत आहे. 


त्रिपेंदर सिंह पाकिस्तान एजेंसी आयएसआयला अनेक वर्ष माहिती पुरवत होता. त्याने पंजाब आणि भारतातील अनेक महत्त्वपूर्ण भागातील माहिती पाठवली होती. तसेच सरकारी कार्यालयांसह त्याने अनेक महत्त्वाच्या स्थळांविषयी माहिती पुरवली होती.