नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित मद्य धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 3 तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवण्यात आल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला. तत्पूर्वी, केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. 






मद्य धोरणाचे केजरीवाल सूत्रधार


यावेळी ईडीने 10 दिवसांची कोठडी मागितली. न्यायालायने ती मान्य केली. ईडीने मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे हटवल्याचा दावा केला. अनेकांचे फोन फुटले आहेत. दिल्ली दारू धोरण बनवण्यात केजरीवाल यांचा थेट सहभाग होता. रोख रक्कम दोनदा हस्तांतरित करण्यात आली. आधी 10 कोटी आणि नंतर 15 कोटी रुपये देण्यात आले. केजरीवाल यांना पंजाब आणि गोवा निवडणुकीसाठी निधी हवा होता. गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये वापरले गेले, असा दावा केला आहे. 


केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ईडीकडे सर्व काही आहे, मग अटकेची काय गरज होती? 80 टक्के लोकांनी केजरीवाल यांचे नाव घेतले नाही. ते कधी भेटले हेही सांगितले नाही.


ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) राजू यांनी युक्तिवाद केला तर अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी, विक्रम चौधरी आणि रमेश गुप्ता यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. केजरीवाल यांना काल 21 मार्च रोजी सीएम हाऊसमधून अटक करण्यात आली होती. त्यांनी रात्र ईडीच्या लॉकअपमध्ये घालवली.


पहाटे केजरीवाल यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काही वेळातच केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर अर्ज मागे घेण्याची विनंती केली.


केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाला सांगितले की, ट्रायल कोर्टातील रिमांडची प्रक्रिया सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीशी क्लॅश होत आहे. त्यामुळे त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी द्यावी. आम्ही आधी ट्रायल कोर्टात रिमांडची कारवाई लढवू आणि त्यानंतर दुसरी याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात येऊ.


दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या आयटीओमध्ये निदर्शने केली. दिल्ली सरकारचे दोन मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान केजरीवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. राहुल गांधी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटू शकतात, असे सांगण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या