नवी दिल्ली : दिल्लीतील कॅथलिक चर्चच्या मुख्य पाद्रींनी लोकशाही धोक्यात आल्याचं म्हणत मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. दिल्लीचे आर्चबिशप अनिल कोटो यांनी देशभरातील इतर चर्चच्या धर्मगुरुंना पत्र लिहून हा संदेश दिला आहे.


लोकशाही धोक्यात आली असताना पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत. त्यामुळे आपण देशासाठी प्रार्थना अभियान सुरु करायला हवं, असंही कोटो यांनी म्हटलं आहे. संविधानाची लोकशाही तत्त्वं आणि निधर्मी रचनेला धोका निर्माण करणाऱ्या प्रक्षुब्ध राजकीय वातावरणापासून देशाला वाचवायला हवं, असं ते म्हणतात.

'निवडणुका आणि सरकार यांची आम्हाला चिंता वाटते. व्यक्तिस्वातंत्र्य, ख्रिस्ती बांधवांचे हक्क आणि कल्याण यांची काळजी घेणारं सरकार सत्तेत यायला हवं. मी कट्टर राजकारणात हस्तक्षेप करत नाही. मात्र देशाची वाटचाल योग्य दिशेने व्हावी, अशी प्राथर्ना करतो.' असं कोटो म्हणाले.



भाजपसह संघाच्या नेत्यांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मोदी सरकारनं धर्मांतरांचे उद्योग बंद केल्यामुळेच पादरींमध्ये अस्वस्थता पसरल्याचा दावा संघानं केला आहे. धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी हे पत्र लिहिल्याची टीका केली जात आहे.