नवी दिल्ली : दिल्लीतील करोल बागमधील चार मजली हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये आज पहाटे लागलेल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, ज्यात बाळ आणि महिलांचाही समावेश आहे. मृतांमध्ये दिल्लीत आलेल्या पर्यटक आणि इतरांचा समावेश आहे. याशिवाय म्यानमार आणि कोच्चीमधूनही आलेल्या लोकांचा आगीत मृत्यू झाला. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या दिल्लीतील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अग्निशमन दलाने हॉटेलमधून 30 पेक्षा जास्त जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सोबतच आगीवर नियंत्रण मिळवून बचावकार्य पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं. मृतांमध्ये बहुतांश जण एकाच कुटुंबातील असून ते केरळच्या कोच्चीचे रहिवासी आहेत. एका लग्नासाठी ते दिल्लीत आले होते. मात्र काही मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या दुर्घटनेतील बऱ्याच लोकांचा मृत्यू श्वास गुदमरुन झाला आहे. एसी रुमच्या खिडक्या (काचेच्या खिडक्या) बंद होत्या, ज्यामुळे धूर बिल्डिंगबाहेर जाऊ शकला नाही. गाढ झोपेत असलेल्या हॉटेलचे पाहुणे आगीच्या कचाट्यात सापडले. यावेळी चार ते पाच जणांनी इमारतीवरुन उडी मारली. दोघांनी उशीच्या आधारे उडी मारली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
बचावकार्यादरम्यान बाहेर काढलेले मृतदेह आणि जखमींना राम मनोहर लोहिया रुग्णालय, लेडी हार्डिंग रुग्णालय, गंगा राम आणि जवळच्या नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं आहे.
बेसमेंट आणि चार मजले, अशी हॉटेलची इमारत आहे. यामध्ये सुमारे 65 खोल्या असल्याचं समजतं. त्यावर किचन आहे. पहिल्या मजल्यावर आग लागली, जी वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये 100 पेक्षा जास्त पाहुणे आणि 15-20 कर्मचारी होते, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आग लागल्याचं ज्यांना कळलं, ते तिथून सुरक्षित बचावले. बाकीचे अंधार आणि धुरात अडकले.
हॉटेलमध्ये फायर सेफ्टीची योग्य व्यवस्था नव्हती. गेस्ट हाऊस आणि हॉटेलमध्ये आपत्कालीन रस्ता नव्हता. एसीमुळे सगळ्या खिडक्या बंद होत्या. अग्निशमन दलाचे जवान शिडीच्या मदतीने रुमच्या खिडक्या तोडून आत पोहोचले. तिथूनच लोकांना बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे. पोलिस कारणांचा शोध घेत आहेत. हॉटेल मालकाला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
दिल्लीतील हॉटेलमधल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये बाळाचाही समावेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Feb 2019 08:20 AM (IST)
हॉटेलमधील भीषण आगीमुळे तिथे एकच गोंधळ झाला. काही जणांनी इमारतीमधून उडी मारल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -