नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात आरक्षित तिकिटावर दुसऱ्याच प्रवाशाने कब्जा मिळवला, ज्यामुळे तिकिट बूक करणाऱ्या प्रवाशाला मनस्ताप सहन करावा लागला. आता या मनस्ताप सहन करावा लागलेल्या प्रवाशाला रेल्वे 75 हजार रुपये नुकसान भरपाई देणार आहे.


दिल्लीच्या ग्राहक न्यायालयाने जिल्हा ग्राहक न्यायालयाचा आदेश कायम ठेवत हा निर्णय दिला आहे. प्रवाशाला झालेल्या त्रासाबद्दल रेल्वे मंत्रालयाने 75 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्याने चार वर्षांपूर्वी 30 मार्च 2013 रोजी लिंक दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तिकिट बूक केलं. मात्र मध्य प्रदेशातील बीना येथे काही जण ट्रेनच्या डब्यात चढले आणि जबरदस्तीने आरक्षित जागेवर कब्जा केला. गुडघे दुखीचा आजार असल्यामुळे लोअर बर्थ निवडला होता, असं तक्रारदाराने म्हटलं आहे.

अज्ञात प्रवाशांनी जबरदस्तीने आरक्षित जागेवर कब्जा केल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे 20 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक मंचाकडे केली होती.

कोर्टाने नोटीस पाठवूनही रेल्वेकडून कोणताही अधिकारी सुनावणीसाठी हजर झाला नाही. त्यामुळे कोर्टाने प्रतिवाद्याच्या अनुपस्थितीतच निर्णय सुनावला. जिल्हा ग्राहक मंचाने 2014 मध्येच निर्णय सुनावला होता. या दंडाच्या रक्कमेपैकी 25 हजार रुपये त्यावेळच्या ड्युटीवर असणाऱ्या टीसीच्या पगारातून घ्यावेत, असा आदेशही ग्राहक मंचाने दिला होता.